रेडक्रॉस सोसायटीमध्ये लोकांचा सहभाग वाढवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । नागपूर । देशात परोपकाराची भावना आजही कायम आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यात येते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. कोश्यारी बोलत होते. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे अध्यक्ष डॉ. अशोक ब्राह्मणकर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रमणी गुप्ता व सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे करण्यात येतात. प्रत्येक व्यक्ती जागरूक झाला तर आपण आपल्या परिसरातील समस्यांवर मात करू शकतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. चंद्रमोहन गुप्ता यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ८१ वेळा रक्तदान करणारे प्रीतम राजाभोज, ४०० आजीवन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य करणारे ललित थानथराटे, २४ पदव्या प्राप्त करणारे ॲड. डॉ. सौरभ गुप्ता यांना देखील सन्मानित केले.

डॉ. ब्राह्मणकर यांनी प्रास्ताविकातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडारा राबवित असलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा भंडाराचे हेमंत चंदावस्कर, डॉ. नितीन तुरस्कर, दिनेश पंचबुद्धे, प्रीतम राजाभोज, राजीव खवसकर, डॉ. निलेश गुप्ता, अमित वसानी, हनुमानदास अग्रवाल, किशोर चौधरी, रतन कळंबे, दीपक व्यवहारे, वासुदेव निर्वाण, डॉ. विशाखा गुप्ते, मीरा भट्ट, सुचिता गुप्ता व सुनीता गुप्ता यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!