स्थैर्य, सातारा, दि 02 : एकीकडे देशात करोनाच्या साथीने थैमान घातले असतानाच दुसरीकडे बेरोजगार युवकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यामुळे कमी श्रमात झटपट पैसे कमावण्याचे अनेक फंडे शोधून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचे उद्योग सुरू आहेत. गुगल पे वर आपले पेमेंट करा असा सांगणारा एखादा फोन आल्यास नागरिकांनी सावध राहावे. दरम्यान, अनेक जणांची गुगल पे च्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या लॉकडाउन असल्याने अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अनेक कंपन्यांनी आपले कर्मचारी कामावरून कमी केले आहेत. काही उच्चशिक्षित तरुणांकडून नागरिकांना प्रथम फोन येतो. फोनवरून ही व्यक्ती एखादी वस्तू विकत घेण्याची गळ घालते. समजा त्या नागरिकाला ती वस्तू आवडली असेल तर समोरची व्यक्ती वस्तू घेणार्याला आपण आपल्या गुगल पे अकौंटवरून आम्हाला पेमेंट करू शकता असे सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगते आणि पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर एक दोन दिवसात संबंधित फोन बंद केला जातो. दुसरीकडे पैसे दिलेला व्यक्ती वस्तू येण्याची वाट पहाते आणि वस्तू न आल्याने त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी संंबंधित नंबर बंद असल्याचा मेसेज वाजत राहतो. त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. याबाबत पोलीस ठाण्यातील सायबर विभागात तक्रार दाखल केल्यावरही या यंत्रणेला हा नंबर शोधून काढण्यात अपयश आल्याची अनेक उदाहरणे आहेत. आतापर्यंत सातारा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील अनेकांना अशा फेक लोकांनी लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
सातार्याच्या उपनगरात राहणार्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे हवे आहेत का अशी चौकशी करून सदर सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला घरपोच देण्यात येतील अशी हमी दिली होती. या कॅमेर्याचे पैसे गुगल पे ने पाठवा अशी सूचनाही त्यांनी केली होती. मात्र सदर व्यक्तीला संशय आल्याने त्याने ट्रान्स्पोर्ट बंद असताना तुम्ही कॅमेरे कसे पाठवणार असा प्रश्न विचारला असता संबंधिताने माझा भाऊ आर्मीमध्ये असून आर्मीच्या गाडीने तुम्हाला डिलिव्हरी देण्यात येईल असे सांगण्यापर्यंत त्याची मजल गेली. ज्या मोबाईलवरून कॉल येतो त्याचा व्हॉटस्अॅप डीपी पाहिला असता आर्मीचा ड्रेस घातलेल्या व्यक्तीचा फोटो पाहायला मिळतो. दुसर्या एका प्रकरणात ओएलक्स या जुन्या गाड्या व वस्तू विकणार्या एका अॅपवर जुनी दुचाकी गाडी विकताना सदर गाडीची एक चावी आपल्याकडे ठेवून काही दिवसांनंतर ती गाडी दुसर्या चावीच्या मदतीने चोरून तिसर्या व्यक्तीला विकण्याचे असंख्य प्रकार उघडकीस येत आहेत. अशा जुन्या गाड्या विकत घेताना एकच चावी देणार्या मालकापासून सावध न राहिल्यास हमखास दुचाकीची चोरी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहावे. शक्यतो ओळखीच्या व्यक्तीसोबतच गुगल पे चे व्यवहार करावेत तसेच ओएलक्स वरून गाडी खरेदी करताना काळजी घ्यावी.