दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले आहे.
यापूर्वी प्राध्यापकांना देण्यात येणारे प्रति तास रूपये 300 इतके मानधन तुटपुंजे ठरत असल्याने यात वाढ करून हे मानधन आता एक हजार रूपये इतके करण्यात आले आहे.
तासिका तत्वावरील हे निमंत्रित प्राध्यापक संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत किंवा सेवानिवृत्त तज्ज्ञ व्यक्ती असले पाहिजे. याबाबतची खात्री सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्याकडून करण्यात येईल. या निमंत्रित प्राध्यापकांना मानधनाव्यतिरिक्त दैनिक भत्ता, वाहन भत्ता अनुज्ञेय असणार नाही.