दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । सातारा । मार्च महीन्यापासुन देशातील विविध राज्यातील अनेक भागामध्ये तापमानामध्ये वाढ होत आहे. हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मुक आपत्ती आहे (Silent Disestr). सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 4.5 अंश से. ते 6.4 अंश से. तापमानात वाढ असेल तर त्यास उष्णतेची लाट संबोधली जाते. किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान 45 अंश से. पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे असे समजले जाते. या उष्णतावाढीचे मानवी शरिरावर परिणाम होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, नेहरु युवा मंडळे यांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची (पोणपोई) व्यवस्था करावी, तसेच सावलीची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केलेले आहे.
उष्णतेचा लाटेचा त्रास खालील नमुद व्यक्तींना अधिक होऊ शकाते (जोखमीच्या व्यक्ती)
वयोवृध्द व लहानमुले, गरोदर महिला, उन्हामध्ये बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, स्थुल लोक, अनियंत्रीत मधुमेह, हृदयरोग, मेंदुशी निगडीत आजार श्वसन संस्था, किडणी इ. निगडीत गंभीर आजार असणारे लोक. काही विशिष्ठ औषधे घेणारे लोक. निराश्रीत व घरदार नसलेले गरीब लोक.
लक्षणे
उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास हा किरकोळ किंवा गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासामध्ये शरिरावर पुरळ उठणे, हाता पायामधुन गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो. गंभीरस्वरुपामध्ये उष्माघाताचा समावेश होते. या मध्ये यव्यक्तीस वेळेत उपचार नाही मिळाला तर मृत्यूही संभवतो.
उष्णतेचे आजार टाळण्याकरिता हे करावे
पुरेसे पाणी प्यावे, प्रवासामध्ये पाणी सोबत ठेवावे, गरजेनुसार जलसंजिवनी, लिंबू सरबत, ताक इ. चा वापर वारंवार करावा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे सैलसर कपड्याचा वापर करावा. उन्हाळ्यात छत्री, टोपी, गॉगल, पादत्राणे इ. चा वापर करावा. ओलसर पडदा, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे.
कामगारांसाठी सुचना
सुर्यप्रकाशामध्ये काम करणे टाळावे, शारिरीक कष्टाची कामे उन्हामध्ये करु नयते, सलग उन्हामध्ये काम करणे टाळावे, अधुन-मधुन सावली मध्ये विश्रांती घ्यावी. जास्तीतजास्त घरामध्ये रहावे, उन्हामध्ये जावू नये. पाळीव प्राणी यांना सवालीमध्ये व थंड ठिकाणी ठेवावे.
ह्या बाबी करु नयेत
शक्यतो उन्हाच्या वेळी घराबाहेर जाणे टाळा, अनवानी बाहेर जाणे टाळा, कष्टाची कामे उन्हामध्ये करु नयेत. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर थंड ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रींक टाळा. खुप प्रथीने युक्त अन्न व शिळे अन्न खावू नका.
उष्माघात संबंधित आजाराचे रुग्ण आरोग्य संस्थेत घेवून जाण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथमिक उपचार करावेत. रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीमध्ये पंखे, कुलर लावावेत. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत व लवकरात लवकर नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये घेवून जावे (या करीता 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन आरोग्य संस्थेत घेवून जावे).
उष्माघात उपचार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना जिल्हा प्रशासनामार्फत सुचित केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या संबंधित किरकोळ व गंभीर आजाराच्या उपचारासाठी नजिकच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार घ्यावा.