![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2023/03/Ramraje-Naik-Nimbalkar.jpg?resize=489%2C237&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतण्याच्या तयारीत असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर गत पाच दिवस आयकर विभागाची चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये काही एक निष्पन्न झाले नसते तरी सुद्धा, या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागले होते. काल रात्री चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज “सुरुवात तुम्ही केली आहे; शेवट मी करणारच” असे WhatsApp स्टेटस ठेवून त्यांनी विरोधकांना सूचक असा इशारा दिला आहे.
बुधवारी सकाळी ६ वाजता पासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे, फलटण येथील निवासस्थानावर आयकर विभागाने छापे टाकले होते. या चौकशीत गोविंद दूध डेअरी व त्याच्या समंधित असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली होती. तब्ब्ल ५ दिवस तरी ही कारवाई सुरूच होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत होते. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाची ही कारवाई झाल्याने राजकीय आकसापोटी केलेली कारवाई असल्याचे आरोप माजी आमदार दिपक चव्हाण यांनी केला होता.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “लोकांनी आश्वस्त राहावं. या धाडीमधून काहीही निष्पन्न होणार नाही. अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आणि प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. आम्हाला खात्री आहे की, या कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही” असे सांगितले आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे; शेवट मी करणारच” असे WhatsApp स्टेटस ठेवून विरोधकांना सूचक असा इशारा दिला आहे. हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.