
स्थैर्य,मुंबई,दि ४: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्या घरावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत इन्कमटॅक्स विभागाची छापेमारी सुरु होती. पुण्याच्या एका हॉटेलमध्ये अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांचीही चौकशी केली गेली. इन्कमटॅक्स टीमने अनेक तास या दोघांची चौकशी केली. बुधवारनंतर गुरुवारीही इन्कमटॅक्सचे हे छापे अजूनही सुरू आहेत. एका टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीतही दुसर्या दिवशी छापा पडला आहे.
आयटी विभागाने मुंबई व पुणे येथे बुधवारी तब्बल 30 ठिकाणी छापा टाकला आहे. अनेक कंपन्यांची खाती स्थगित केली गेली आहेत. तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरांच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
ईडीचीही टांगती तलवार
बुधवारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरावर 2 राज्यांच्या आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. यात तीन अधिकारी हे उत्तर प्रदेशचे होते, तर तीन महाराष्ट्रातील होते. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की, अनुराग आणि तापसी यांच्या घरावर ईडीकडून छापा टाकला जाऊ शकतो.
विकास बहल अनुरागचा पार्टनर होता!
अभिनेता विकास बहल देखील पूर्वी अनुराग कश्यपच्या कंपनीचा एक भाग होता. नंतर अनुरागने त्याला या कंपनीतून दूर केले. एका मॉडेलने # मीटूमध्ये विकास बहलवरही आरोप केले होते. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी विकासला त्याच्या प्रोडक्शन हाऊस ‘फॅंटम फिल्म्स’मधून काढून टाकले होते. या कलाकारांनी मोठी टॅक्स चोरी केल्याचे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या सेलिब्रिटींवर आयकर विभागाने छापा टाकण्याची आणखी काही कारणेही सांगितली जात आहेत. निर्माता मधु मंटेनाबद्दल असे म्हटले जाते की, त्यांचे शेवटचे पाचही चित्रपट फ्लॉप होते, असे असूनही त्यांनी 500 कोटींचा ‘रामायण’ आणि 200 कोटींचा ‘द्रौपदी’ हे चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.
अशा परिस्थितीत त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा व मिळकत आयकर अधिकाऱ्यांच्या नजरेत होती. विकास बहल हे मधु मंटेनाबरोबर अनेक फ्लॉप चित्रपटांचे सह-निर्माता देखील होते, परंतु त्यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात बनलेल्या ‘सुपर थर्टी’ने 147 कोटी कमावले होते.
तापसी जवळील अनेक चित्रपट
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीच्याकडे सध्या चित्रपटांची रंग आहे. ती लवकरच ‘लूट लपेटा’मध्ये दिसणार आहे. तापसीने ‘लूट लपेटा’मधील आपला पहिला लूक शेअर केला आहे. तिच्या या पात्राचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला आहे. ती या काळात टाईम ट्रॅव्हलवर आधारित दुसर्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. याशिवाय ती मिताली राजचा बयोपिक देखील करत आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान!
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि इतर लोकांवर पडलेल्या आयकर धाडीसंदर्भात बोलताना सांगितले की, हे छापे त्याच लोकांवर टाकले जात आहेत. ज्यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न पडत होते. जे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच लोकांवर निवडकपणे हे छापे टाकले जात आहे. कर चुकवणे ही केवळ एक सबब आहे.