मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांना दिले निवेदन
स्थैर्य, सातारा, दि. 16 : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक घडी विस्कटली आहे. प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली असून बेरोजगारांना रोजगार आणि उद्योगधंद्यांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कोरोना महामारीला आळा घालत राज्याची अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. राज्याच्या उद्योग विभागामार्फत मॅग्नेटिक महाराष्ट्र-२.० (भाग दोन) या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. रोजगार निर्मीतीसाठी या योजनेत सातारा औद्योगिक वसाहतीमधील देगांव, निगडी या नवीन एमआयडीसींचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. राज्य सरकार मार्फत मॅग्नेटिक महराष्ट्र २.० या योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. सातारा शहरालगत देगाव, निगडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर असून जमीनीवर तसे शिक्के मारण्यात आले आहेत. याठिकाणी डोंगराच्या पायथ्याची पडीक आणि माळरानण नापिक जमीन विविध उद्योगांसाठी उपलब्ध होईल. तसेच योग्य मोबदला मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. त्यामुळे या नवीन एमआयडीसीचा समावेश मॅग्नेटिक महराष्ट्र २.० या योजनेत करावा आणि भुसंपादनाची प्रक्रिया सुरु करावी.
सातारा शहरापासून पुणे, मुंबई, बंगळूर या शहरांना जोडणारा महामार्ग आहे. वीज, पाणी, मणुुष्यबळ आदी सर्वप्रकारच्या सोयी- सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी छोटे- मोठे उद्योगधंदे उभारण्यास मोठा वाव आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, कामगारांविना बंद पडलेल्या कंपन्या पुर्ववत सुरु होण्यासाठी आणि अर्थव्यवस्था कोलमडल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगधद्यांना उर्जीतावस्था प्राप्त होण्यासाठी सातारा येथील देगांव, निगडी एमआयडीसी अनुकूल आहे. त्यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र या योजनेत सातारा एमआयडीसीचा समावेश करावा आणि या नवीन एमआयडीसीमध्ये छोटे- मोठे उद्योगधंदे, कंपन्या सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.