दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । वाई । वाई तालुक्यातील आसले येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून दांडक्याने व धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्यास सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अझर जब्बार इनामदार, रा.वाई असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, हणमंत किसन कणसे रा. आसले, (पिराचीवाडी), ता. वाई यांनी घरालगतच्या जागेत पाटा गॅरेज अल्लाउद्दीन शफीअहमद सय्यद यांना चालवण्यास दिले आहे. तसेच घरापुढील मोकळ्या जागेत शेडमध्ये जुने टायर विक्रीचे दुकान आहे. पाटा गॅरेज दोन वर्षापुर्वी त्यांनी अजहर जब्बार इनामदार यांना भाड्याने चालवण्यास दिले आहेत. अझरची चांगली ओळख बनल्याने ते कणसे यांच्या घरी नेहमी येत-जात असतात. दि. 24 रोजी रात्री 9.30च्या सुमारास नेहमीप्रमाणे अझर इनामदार कणसे यांच्या घरी चारचाकी (एमएच 04 एक्स 9911) घेऊन आले होते. घरात कणसे यांची मुलगी, गॅरेजमधील कामगार फैजमुन्ना खान हेही होतेे.
टीव्ही पाहत असताना रात्री 12 च्या सुमारास अचानक अनोळखी तीनजण मास्क लावुन घरात घुसले. लगेचच त्यांनी अजहर इनामदार यांस हाताने व दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. झटापट चालु असताना अजहर याने त्यांना ढकलून घराचे बाहेर काढत असताना एकाच्या हातातील दांडके अजहरने हिसकावून एकाचे डोक्यात मारले व त्यांना ढकलून घराचे बाहेर काढले. यावेळी त्यातील एकाने अजहर यांच्या पोटाचे उजव्या बाजुला जीवे मारण्याचे उद्देशाने धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे अझरच्या पोटातून रक्तस्त्राव होवू लागला. आरडा-ओरडा झाल्याने तिघेजण पळून गेले. त्यानंतर कणसे यांनी अजहर यास त्याच्याच कारमधून वाई येथे उपचारासाठी आणले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मिशन हाँस्पिटल वाई येथून यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
याप्रकरणी हणमंत कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई पोलिस ठाण्यात तीन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे.