दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । शिरवळ । शिरवळ, ता. खंडाळा येथे भांडणाचा मनात राग धरत युवकाला कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवर जबरदस्तीने बसवून एका बंद असलेल्या कंपनीमध्ये नेऊन काठीने मारहाण करण्यात आली. यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन युवकासह तिघांवर अपहरण व गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ येथील ओंकार दत्तात्रय क्षिरसागर याला दि. 22 रोजी ओंकार क्षिरसागर याला संग्राम धोंडे यांचा फोन आला की, शुभम देशमुख याचा शर्ट फाटला असून त्याच्या घरून दुसरा शर्ट घेऊन शिरवळ येथील बौद्ध आळी येथील बंद कंपनीजवळ घेऊन ये. त्यानुसार ओंकार क्षीरसागर त्याठिकाणी शुभम देशमुख याला शर्ट देऊन परत घरी परत जात होता. त्याठिकाणी रस्त्यावर आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, मनोज पवार व अल्पवयीन युवकासह आणखी एक युवक यांनी ओंकार क्षिरसागर याला थांबवत तू आम्हाला मारायला आला आहे का? अशी विचारणा करीत मारहाण केली. नंतर दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान मंडाई कॉलनी येथील नवीन मंडाई मातेच्या मंदिरामध्ये ओंकार क्षिरसागरशी पुन्हा त्या युवकांशी भांडणे झाली.
बुधवार दि. 23 जून रोजी ओंकार क्षिरसागर हा केदारेश्वर कॉलनी येथील जिमजवळ उभा असताना त्याठिकाणी आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, मनोज पवार व 17 वर्षीय अल्पवयीन युवकासह त्याठिकाणी दुचाकीवरून आले. यावेळी संबंधितांनी ओंकार क्षिरसागर याला लाकडी दांडका व कोयता दाखवत जबरदस्तीने दुचाकीवर ओंकार क्षिरसागर याला बसवीत त्याचे अपहरण करीत त्याला शिरवळमधील बंद असलेल्या बौद्ध आळीमधील एका कंपनीमध्ये नेत ओंकार क्षिरसागर याला संबंधितांनी काठीने जोरदार मारहाण करीत अंगावर कोयता घेऊन शिवीगाळ करीत धावून गेले. मारहाणीमध्ये गंभीर दुखापत झालेल्या ओंकार क्षिरसागर याने घटनास्थळावरून पलायन करत शिरवळ पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान, ओंकार क्षिरसागर याने दिलेल्या फिर्यादीवरून आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, मनोज पवार व अल्पवयीन 17 वर्षीय युवकाविरुध्द अपहरण व गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवीसह शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, मनोज पवार या युवकांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, मनोज पवार यांना खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने संबंधितांना सोमवार दि.28 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे.