दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । भुईज । वरचे चाहुर पो. भुईज, ता. वाई गावचे हद्दीत महिलेने विषारी औषध प्राशन करून आपल्या तीन वर्षाच्या मुलासही विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी आहे. पूजा सुदाम भोरे असे मृत महिलेचे नाव आहे तर राजवीर सुदाम भोरे वय3 वर्षे असे मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी, वरचे चाहुर पोस्ट भुईज गावच्या हद्दीत पुजा सुदाम भोरे या महिलेने दि 14 रोजी दुपारी 14.45वा.च्या सुमारास राहते घरात अज्ञात कारणावरुन स्वत: विषारी औषध पिवुन आत्महत्या केली व आपला मुलगा राजवीर सुदाम भोरे वय3वर्षे रा. वरचे चाहुर पोस्ट भुईज, ता. वाई, जिल्हा सातारा यासही विषारी औषध पाजून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हवालदार राहूल आमणे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं. कलम 307 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. तपास पो. उ. नि. भंडारे करत आहेत.