
दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । आदर्कि बुद्रुक ता. फलटण येथील एका घरात महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी असे दीड तोळे सोने घेऊन चोरट्याने पलायन केले. ही घटना बुधवार, दि.१८ रोजी मध्यरात्री घडली. याबाबतची फिर्याद सौ. रंजना संपत बर्गे वय ४५ यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदर्की गावात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार चोरट्याने येऊन सौ. रंजना बर्गे यांचे दार वाजवत घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवी हिसकावून घेतली. याच दरम्यान घरातील भांडी, डबे यामधून आणखी काय मिळतेय का? याचा शोध घेतला. याच दरम्यान घरामध्ये दोघे व घराबाहेर दोघे जण थांबले होते. ही घटना घडल्यानंतर चोरट्याने जाताना कोणाला काही सांगितले तर तुझा खून करेन असे सांगितल्याने या भीतीने तिने सकाळी उठल्यानंतर हा प्रकार ९ वाजता थेट पोलीस ठाण्यात येऊन सांगितला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक पाडवी हे करत आहेत.