बेंदुर सण आणि गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरासह तालुक्याच्या काही भागात संततधार पाऊस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२३ । फलटण । बेंदुर सण आणि गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज दुपार पासून फलटण शहरासह तालुक्याच्या काही भागात संततधार पाऊस सुरु असून प्रतीक्षा असलेला पाऊस ढवळ्या – पवळ्याच्या सणा दिवशी बरसत असल्याने बळीराजा सुखावला आहे.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक अंधारुन आले, थोडा वारा सुरु झाला आणि क्षणात दमदार पावसाला सुरुवात झाली, वारा असल्याने पाऊस वाढणार नाही असे वाटत असताना,  वारा अचानक बंद झाला आणि सुरु झालेला संतत धार पाऊस आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु आहे. मधूनच एखादी जोराची चळक येऊन जाते.

फलटण शहराप्रमाणे सासवड, हिंगणगाव, तरडगाव, साखरवाडी, चौधरवाडी, आसू, गोखळी, गुणवरे, दुधेबावी, सासकल, भाडळी, धुमाळवाडी, विडणी या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. दरम्यान नीरा प्रणाली मधील धरण स्थळावर सुरु असलेला पाऊस, दि. १ जून पासून आज अखेर झालेला पाऊस, धरणातील पाणी साठे याबाबत घेतलेली माहितीही दिलासा देणारी आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे, पण आणखी पावसाची गरज आहे. २३.५० टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरणात २.१५ टीएमसी म्हणजे केवळ ९.१७ टक्के पाणी साठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात ६.६३ टक्के पाणी साठा होता.

भाटघरच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ७ मि. मी. आणि आजअखेर एकूण १३४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  १०.०० टीएमसी क्षमतेच्या वीर धरणात १.०६ टीएमसी म्हणजे केवळ ११.३४ टक्के पाणी साठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात ३६.४२ टक्के पाणी साठा होता. वीरच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ०.०० मि. मी. आणि आजअखेर एकूण ४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  १३.०० टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरणात १.२६ टीएमसी म्हणजे केवळ १०.७५ टक्के पाणी साठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात ३.७१ टक्के पाणी साठा होता.

नीरा – देवघरच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात २३ मि. मी. आणि आजअखेर एकूण ३४७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  ३.६९ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरणात ०.५३ टीएमसी म्हणजे केवळ १४.८९ टक्के पाणी साठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात ५.७४ टक्के पाणी साठा होता. गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी संपलेल्या २४ तासात ३३ मि. मी. आणि आजअखेर एकूण १९३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्जन्य मापक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी संपलेल्या २४ तासात ०.६ मि.मी. आणि आज अखेर एकूण ३३.२ मि. मी. वार्षिक सरासरीच्या ३५ टक्के पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!