
स्थैर्य, मुंबई, दि.११: “थकबाकीदारांना व्याजात सूट, पण नियमित कर्ज फेडणाऱ्यांना काहीच नाही’ या विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी भविष्यातील प्रोत्साहन अनुदानाचे अाश्वासन दिले. कोरोनानंतर बिघडलेली अर्थव्यवस्था पूर्ववत झाल्यावर वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पावरील सदस्यांच्या सूचनांना उत्तर देताना परिषदेत ते बोलत होते.
३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज, कृषी पंपांच्या थकीत वीज बिलावरील व्याज आणि दंडात माफी, बाजार समित्यांचे बळकटीकरण या अर्थसंकल्पातील घोषणांची पुनरुक्ती त्यानी केली. रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागाला अधिक निधी दिल्याचे स्पष्टीकरण त्यानी दिले. दरम्यान, सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.