‘इनाया रिन्यूएबल एनर्जी’च्या सोनल भोसेकर ‘शक्ति प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । पुणे ।  ग्रामीण भागात अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा इयाना रिन्यूएबल एनर्जी प्रा. लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका सोनल भोसेकर यांना शारदा शक्ति या संस्थेच्यावतीने ‘शक्ति प्रेरणा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कमीन्स कॉलेजच्या का. बा. जोशी सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ‘शारदा शक्ति’ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता काळे, बडवे इंजिनिअरींग लि.च्या कार्यकारी संचालक सुप्रिया बडवे, ‘शारदा शक्ति’च्या सचिव मनीषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी सुप्रिया बडवे यांनी शारदा शक्तिच्या कामाची प्रशंसा केली तसेच सोनल भोसेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. श्रीमती बडवे यांच्या हस्ते सोनल भोसेकर यांना मानपत्र प्रदान केले.

सोनल भोसेकर यांनी त्यांच्या उद्योगातील वाटचालीची माहिती दिली. त्यांना आलेल्या अडचणी अन्य उद्योगिनींना येऊ नये म्हणून त्यांनी उद्योगिनी फौंडेशनची स्थापना केली आणि आता ते पूर्ण महाराष्ट्र भर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यावर आधारित एक लघुचित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली.

शक्तिच्या प्रबुद्ध महिला आणि उद्योजक महिला मिळून विविध उपक्रम करू शकतात, असा विचार डॉ. संगीता काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला. यावेळी ‘शारदा शक्ति’ ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी संस्था आहे. देशामध्ये संस्थेच्या 18 शाखा आहेत. महिला आरोग्य, पर्यावरण, विज्ञान, शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आदी क्षेत्रात ‘शक्ति’ काम करते, अशी माहिती देण्यात आली.

याप्रसंगी शुभांगी कदम या प्रगतिशील विद्यार्थिनीला ‘स्वशक्ति सपोर्ट’ पुरस्कार आर्थिक सहाय्य स्वरूपात देण्यात आला.

मनीषा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. ऐश्वर्या रानडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसी देशपांडे यांनी शक्ति संस्थेच्या कामाचा अहवाल सादर केला. डॉ प्रिया हेर्लेकर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!