दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित दहाव्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’चे औचित्य साधून स्व.यशवंतराव चव्हाण यांच्यावर आजवर प्रसिद्ध झालेल्या उपलब्ध ग्रंथांचे ‘ग्रंथ दालन’ उभारण्यात आले आहे. यामध्ये नरुभाऊ लिमये, बाबुराव काळे, राम प्रधान, गोविंद तळवळकर, अरुण शेवते, रामभाऊ जोशी अशा मान्यवरांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेसह सत्तरहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाणांचे विविध पैलू अधोरेखित करणार्या दुर्मिळ साहित्याचा एकत्रित ठेवा या ग्रंथ दालनाच्या निमित्ताने पहायला मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.