मेढा सेंटर सोसायटीच्या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 19 : सातारा जिल्हा  बँक पुरस्कृत व नाबार्डच्या आर्थिक सहकार्यातून बँक संलग्न मेढा सेंटर  विकास सेवा सोसायटीच्या अद्ययावत इमारतीचे उदघाटन बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि संचालक वसंतराव मानकुमरे, नाबार्डचे सातारा विभागाचे डी. डी. एम. सुबोध अभ्यंकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, मेढ्याचे नगराध्यक्ष व नगरसेवक, संस्थेचे चेअरमन शांताराम पार्टे, व्हाईस चेअरमन सौ. मनीषा गुरव तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

याप्रसंगी आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जिल्हा बँकेचे कामकाज अत्यंत चांगले व पारदर्शक असून  देशामध्ये नावलौकिक प्राप्त अग्रगण्य बँक आहे. ग्राहक सेवेला अत्यंत महत्त्व दिले असून ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. बँकेने सामाजिक भूमिका नेहमीच पार पाडली आहे. मेढा सेंटर विकास सेवा सोसायटी अंतर्गत 12 गावे  जोडली असून डोंगरी भागामध्ये नगदी पिकांचे उत्पादन नसताना देखील संस्थेने आपली आर्थिक स्थिती चांगली ठेवली आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक असून संस्थेस सलग तीन वर्षे सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मध्ये  आहे. दुर्गम व डोंगरी भागातील कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज करीत असल्यामुळेच बँकेने मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीची शिफारस केली आहे.

बँकेचे संचालक  वसंतराव मानकुमरे यांनी नाबार्डच्या सहकार्याने बँकेने मेढा विकास सेवा सोसायटीचे नूतनीकरण करून शेतकरी व ग्राहकांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक केले. मेढा येथील शेतकर्‍यांना जिल्हा बँकेने  मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेच्या सर्वंकष कामकाजाची नोंद देशाबाहेरही झाली असून बँकिंग कामकाजाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून बँक विकासाभिमुख कामकाज करत आहे. नाबार्डच्या पॅक्स डेव्हलपमेंट सेल अंतर्गत मेढा विकास सेवा सोसायटीची निवड झालेली आहे. सातारा जिल्हा बँक देखील विकास सेवा सोसायटी सक्षमीकरणासाठी बँकेच्या नफ्यातून प्रतिवर्षी भरीव आर्थिक मदत करीत आहे.

याप्रसंगी बँकेचे विभागीय विकास अधिकारी  शेलार, तालुक्यातील सेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन, सचिव, पदाधिकारी, शाखेचे अधिकारी व महिला व सदस्य, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक, ज्येष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!