स्थैर्य, चंद्रपूर, दि.२५: म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराकरिता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत क्राइस्ट रुग्णालय येथे २० बेड कार्यान्वित करण्यात आले असून सदर रुग्णांना तातडीने उपचार द्यावा अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन प्रसंगी प्रशासनाला दिल्या. दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, क्राइस्ट रुग्णालयाचे फादर जोशी जोसेफ, डॉ. अजय कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस या आजारावर रुग्णांना विहित व योग्य वेळेत उपचार मिळावा यासाठी क्राइस्ट रुग्णालय येथे 20 बेड व डॉ. वासाडे रुग्णालय येथे 20 बेड असे एकूण 40 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यापैकी क्राइस्ट रुग्णालय चंद्रपूर येथील वीस बेडचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने आज पार पडले.
म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी क्राइस्ट रुग्णालय येथे 9 तज्ञ डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे. त्यासोबतच उपचारासाठी लागणारी उपकरणे, साधनसामुग्री, सुसज्ज ऑपरेशन थेटर, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आलेले आहे.
पालकमंत्री म्हणाले की, भविष्यात सदर रुग्णांच्या उपचारासाठीची व्यवस्था, उपकरणे, औषधी, इंजेक्शन तसेच लहान मुलांच्या आरोग्याच्या उपचारासाठी आवश्यक ती तयारी करून घ्यावी. कोरोना आजाराची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असून अशावेळी रुग्णालयात दाखल झालेल्या लहान बालकांचा आपल्या पालकांशी संवाद साधण्यासाठी बेड मॉनिटरिंगची पर्यायी व्यवस्था करावी.
तसेच कोरोना आजारातून बरे झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची कंट्रोल रूमच्या माध्यमातून दैनंदिन माहिती घ्यावी.लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार द्यावा असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 10 बेड कार्यान्वित करण्यात येत असून त्यांना लागणारी उपकरणे खरेदी साठी मान्यता दिली असल्याचे यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी सर्व तालुक्यांचे व्हाट्सअप ग्रुप कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कोरोनातुन बरे झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची माहिती दैनंदिन घेतल्या जात आहे. तसेच त्यांना मधुमेह नियंत्रणात ठेवणे, तसेच इतर आरोग्य विषयक सूचना दैनंदिन देण्यात येणार आहे.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.