दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । पर्यटन संचालनालय, पुणे विभाग व आय आय टी टी एम ग्वाल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे पर्यटन क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी दि.२१ ते २५ मार्च या कालावधी शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती करमरकर यांनी हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यामागे शासनाची असणारी धारणा विषद करुन ग्रामीण भागातील युवकांनी व युवतींनी अधिकाधिक प्रमाणात पर्यटन क्षेत्रात यावे. आपला व पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी टीएएएस चे अध्यक्ष अमित कदम यांनी सातारा जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढावा व त्यांना योग्य अशी माहिती या विद्यार्थ्यांकडून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त करुन सातारा जिल्ह्याला पर्यटनाचा मोठा इतिहास असून त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत सांगितले.
यावेळी प्रशांत ढेकणे, लिनेश निकम, योगेश निरगुडे, अजय कुलकर्णी उपस्थित होते. आय आय टी टी एम ग्वाल्हेर येथील तज्ञ प्रशिक्षक रविंद्र डोगरा हे प्रशिक्षणार्थींना पाच दिवसांचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणाचा एकूण 52 प्रशिक्षणार्थी लाभ घेत आहेत.