बांदा येथील टेलिमेडिसिन हेल्थ केअर सुविधेचे लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ नोव्हेंबर २०२२ । सिंधुदुर्गनगरी । जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध झाली असली तरी इतर 36 आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन सुविधा देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे.  त्यामुळे लवकरच जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येदेखील टेलिमेडिसिनची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी स्वखर्चातून दिलेल्या रेमिडी नोवा सोल्युशन्स टेलिमेडिसिन किटचे उदघाटन त्यांच्याच हस्ते आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिलेल्या दोन किट्स पैकी एका किटचे उद्घाटन काल माणगाव आरोग्य केंद्रात झाले होते. आज बांदा आरोग्य केंद्राला दुसरे किट देण्यात आले आहे.  जिल्ह्यात  बांदा येथे अत्याधुनिक टेलिमेडिसीन हेल्थकेअर किटचे उद्घाटन पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  राजन तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, सरपंच अक्रम खान, तहसीलदार श्रीधर पाटील, गट विकास अधिकारी व्ही.एन. नाईक, समीर सावरकर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. अशा रुग्णांना डॉक्टर्स उपलब्ध करून देणे आवश्यक असते, म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे धोरण स्वीकारल्यामुळे गावागावात इंटरनेटची सुविधा पोहोचली आहे. त्याचा उपयोग करून घेऊन शहरात असणारे काही डॉक्टर्स ग्रामीण भागात सेवा द्यायला तयार आहेत. त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या हेल्थ केअर किट सुविधेबरोबरच स्वस्त दरात  जेनेरिक मेडिसिन देखील रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात देखील लवकरच जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचा निर्णय आज झाल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.  हा टेलिमेडिसिनचा कन्सेप्ट जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे.

यावेळी न्यूरोसीनाप्टिक कम्युनिकेशन प्रा. लिमिटेड च्या समीर सावरकर, राजन तेली यांनीही  विचार व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी टेलिमेडिसीन यंत्रणेबद्दल माहिती देताना पालकमंत्र्यांचे आभार मानले.

हेल्थ केअर किटच्या उदघाटनानंतर बांदा येथील अभिषेक दासू गावित या पहिल्या रुग्णाची तपासणी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी सर्व प्रकारची डिजिटल उपकरणे कशा प्रकारे वापरली जातात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सिएचओ तेजस्वी माजगावकर यानी ही तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दादू कवीटकर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!