दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि; हुपरी – यळगुड व श्रीराम सहकारी साखर कारखाना लि; फलटण च्या सन 2022 – 23 ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणात ऊसाची मोळी टाकून युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाला.
यावेळी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या प्रारंभी कारखान्याचे संचालक शरद रणवरे व सौ.अनुजा रणवरे या दांपत्याच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हाणात मोळी टाकून हंगामाचा शुभरंभ करण्यात आला.
कार्यक्रमास श्रीराम व जवाहर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, ऊसतोडणी कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यंदाच्या गळीत हंगामाबाबत कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि; फलटण हा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि; हुपरी – यळगुड यांचेमार्फत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि; हुपरी – यळगुड ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लि; फलटण या नावाने भागीदारी तत्वावर सुरु असून चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता 4950 मे. टन करणेचे आधुनिकीकरणाचे कामकाज चालू असून सदर कामकाज लवकरच पूर्ण होऊन प्रतिदिन 4950 मे. टन इतके ऊस गाळप होईल.
गाळप हंगाम 2022 – 23 मध्ये अंदाजे 6.50 लाख ते 7.00 लाख गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे. त्या दृष्टीने मशिनरी आधुनिकीकरणाचे काम व ऊस नोंदणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन केलेले आहे. यावर्षी ऊस उत्पादकांनी 129 हेक्टर इतका ऊस नोंद केलेला आहे व सदरचा ऊस आणणेसाठी ट्रक 192, अंगद बैलगाडी 256 व बैलगाडी 150 इतक्या वाहनांचे करार करुन ऊस पुरवठ्याचे नियोजन केलेले आहे. सन 2021 – 22 या गाळप हंगामाध्ये कारखान्याचे एकूण ऊस गाळप 5,05,425.996 मे. टन इतके उच्चांकी गाळप केलेले असून एफ.आर.पी. दर रु. 2,761 प्रती मेट्रीक टनाप्रमाणे एकूण रु.139,54,81,175 इतक्या रक्कमेचे संपूर्ण ऊस पेमेंट ऊस पुरवठादार यांचे बँकखाती वेळेत वर्ग करणेत आलेले आहे. कारखान्याकडे प्रतिदिन 30 केएलपीडी क्षमतेची डिस्टीलरी असून दिनांक 28/12/2021 ते दिनांक 05/11/2022 अखेर 63,97,961 इतके लिटर पिरीटचे उत्पादन केलेले असून सदर डिस्टीलरी प्रतिदिन 180 केएलपीडी क्षमतेची करणेसाठी वार्षिक सभेने मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार शासनाकडे प्रशासकीय मंजूरी घेणेचे कामकाज चालू आहे.