दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । पुणे । महाराष्ट्र दिनानिमित्त ‘सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर’ कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत निर्देश होते. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाने शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्यातील प्रत्येक पंचायत समितीमध्ये आणि नगरपरिषद कार्यालयांमध्ये योजनांच्या घडीपत्रिकांचे वाटप तसेच वाचन करण्याचा उपक्रम करण्यात आला. यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली, अशी माहिती आयुक्त डॉ. नारनवरे यांनी दिली.