स्थैर्य, कोरेगाव, दि.२४: कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या श्री.काडसिध्देश्वर कोविड हाँस्पिटलचा शुभारंभ राज्याचे राज्य गृहमंत्री ना .शंभूराज देसाई यांच्या हस्ते सोमवार दि.२४ रोजी दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंबवडे समंत वाघोली ,ता.कोरेगाव येथील रघुकूल मंगल कार्यालयात श्री.काडसिध्देश्वर कोविड हाँस्पिटल युनिट क्रमांक -३ सुरू करण्यात येत आहे. या हाँस्पिटलमध्ये एकुण ७० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ६० बेड हे आँक्सिजन सुविधेसह असतील. या युनिट क्रमांक ३ हाँस्पिटलमध्ये तीन डॉक्टर ,पंधरा परिचारिका ,आरोग्य सहाय्यक व इतर कर्मचारी वर्ग रात्रंदिवस कार्यरत राहणार आहेत. याठिकाणी होणारा उपचार हा पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. रूग्णांना चहा ,नाष्टा यांच्या सह जेवणाची सोय सुध्दा करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात वैयक्तिक स्वखर्चाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जनतेला वैद्यकीय सेवा व मोफत उपचार उपलब्ध करून देणारे आमदार महेश शिंदे हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव आमदार आहेत. सध्याच्या काळात लोकांना उपचारासाठी योग्य वेळी हाँस्पिटल ,आँक्सिजन बेड ,रूग्णवाहिका मिळत नव्हती. अशावेळी आमदार महेश शिंदे यांनी कसलाही विलंब न लावता कोरेगाव येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कोविड हाँस्पिटलची निर्मिती अगदी कमी कालावधीत केली. यासाठी त्यांनी सर्व साधनसामग्री थेट अमेरिकेतून मागवून घेतली आहे. या हाँस्पिटलमध्ये उपचार घेऊन आनंदाने हजारो लोक घरी सुखरूप परतली आहेत. अशी माहिती माजी जि.प.सदस्य राहुल कदम यांनी दिली. या उद्घाटनप्रसंगी परिसरातील नागरिकांना उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार महेश शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ.प्रियाताई शिंदे ,डॉक्टर सौ.अरूणाताई बर्गे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी पोपट भोज ,श्री.मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनसिंग कदम ,खरेदी विक्री संघाचे अजय कदम ,मनोज गाढवे ,अँड .संजय सकुंडे ,महेश कोरडे ,नंदराज मोरे ,तानाजी गोळे ,अमर बांदल ,जितेंद्र कदम ,रुपेश पिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.