दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्ह्यातील रंगकर्मींचे हक्काचे स्थान असलेल्या शाहू कला मंदिराची तिसरी घंटा मंगळवारी सायंकाळी वाजणार आहे. नुतनीकरणासह हे कलामंदिर नाट्यप्रयोग व कार्यक्रमांसाठी सज्ज झाले असून या नवीन वास्तूचा शुभारंभ सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी २१ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे . उदघाटनानंतर सातारकरांसाठी मोफत ‘घाशीराम कोतवाल’ या नाट्यप्रयोगाचे पालिकेने आयोजन केले आहे.
पालिकेच्या माध्यमातून नोव्हेंबर २०११ मध्ये शाहू कला मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. त्यानंतर या कला मंदिराकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. ध्वनी यंत्रणा, आसनव्यवस्था, मोडकळीस आलेला रंगमंच, मेकअप रूमची दुरवस्था, वातानुकूलन यंत्रणेत होणारे बिघाड अशा अनेक समस्या निर्माण झाल्याने रंगकर्मींमधून वारंवारी तक्रारी केल्या जात होत्या. याची दखल घेत प्रशासनाने वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, सर्वसामान्य निधी अनुशेष, स्थायी समितीचा निधी व नगराध्यक्ष फंड अशा वेगवेगळ्या शीर्ष अंर्तगत सुमारे १ कोटी रुपये खर्च करून शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले.
करोनामुळे नुतनीकरणाच्या कामात व्यत्यय आला होता. आता हे काम पूर्ण झाले असून, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाहू कला मंदिर मंगळवारपासून नाट्यप्रेमींसाठी खुले होणार आहे. या नुतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार, दि. २१ रोजी केले जाणार आहे . यानिमित्त सातारकरांसाठी सायंकाळी ६ वाजता ‘घाशीराम कोतवाल’ या नाट्यप्रयोगाचे आयोजनही करण्यात आले आहे.