शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, जळगाव, दि. २३: जळगाव शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने कृषि विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व ॲग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत कृषि कार्यालय आवारात तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर चौधरी, आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, ॲग्रोवर्ल्डचे शैलेश चव्हाण यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, कोरोनाच्या काळातही बळीराजा विविध अडचणींना तोंड देऊन शेतमाल पिकवित आहे. त्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषि विभागाने यासारखे विविध उपक्रम राबवावे. जेणेकरुन ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल. या प्रकारचे महोत्सव तालुक्याच्या ठिकाणीही भरविण्याची सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.

हा उपक्रम राबविण्यामागील भूमिका विशद करताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर म्हणाले, या महोत्सवात ग्राहकांना आवश्यक असणारे तांदूळ तसेच सांगली येथील हळद उपलब्ध आहेत. जळगावमध्ये या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वीही देवगड येथील हापूस आंबा, नाशिक येथील द्राक्षे, लासलगावचा कांदा तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला व इतर पिकांच्या विक्रीलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना तांदळाच्या बॅगचे वितरण करण्यात आले. उपस्थितांचे आभार श्री. चव्हाण यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!