मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले जयंतीनिमित्त प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२३ | फलटण |
फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी व तत्त्वज्ञान विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती विभागातील मा. प्रा. राजकुमार कदम हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते.

प्रा. कदम यांनी ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि श्री. अरविंद यांचे तत्त्वचिंतन’ या विषयावर अभ्यासपूर्ण आणि वक्तृत्वपूर्ण शैलीत व्याख्यान दिले. प्रा. कदम यांनी याप्रसंगी बोलताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व, त्यांचा अभ्यास, तत्कालीन समाजात असलेली त्यांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा या गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला. रवींद्रनाथ टागोर आणि श्री. अरविंद यांचे तत्वचिंतन या विषयाच्या अनुषंगाने तुलनात्मक पण समन्वयात्मक अशी मांडणी केली. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचा उल्लेख करून त्यांच्या प्रतिभेचा गौरव केला.

श्री. अरविंद यांच्या अनुषंगाने बोलत असताना, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या ‘मुक्तीगाथा महामानवाची’ या ग्रंथाचा आणि त्यात हाताळलेल्या विषयाचा ‘सावित्री’ या महाकाव्यासंदर्भात तर्कशुद्ध तात्विक मांडणी केली. रवींद्रनाथ टागोरांचे ‘जन गण मन…’ हे गीत ‘राष्ट्रगीत’ व्हावे हा त्यांच्या प्रतिभेचा देशाने केलेला गौरव होता आणि त्यांच्या ‘गीतांजली’ला नोबेल पुरस्कार मिळावा हे त्यांचेच नव्हे तर आपल्या देशाचे भाग्य होते, असेच म्हणावे लागेल असे सांगून त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले, रवींद्रनाथ टागोर आणि श्री. अरविंद या तिन्ही महापुरूषांच्या तत्त्वचिंतनाचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी ‘मुधोजी महाविद्यालय म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले’ असे समीकरणच महाराष्ट्रभर अनुभवायास मिळते, असे सांगून महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यामागे त्यांचे जीवनचरित्र आणि कार्यकर्तृत्व लोकांपुढे, तरुणांपुढे एक प्रेरणा म्हणून यावे, हाच हेतू असतो असे सांगितले. त्यांनी रवींद्रनाथ टागोर, श्री. अरविंद, प्राचार्य शिवाजीराव भोसले, श्रीमंत मालोजीराजे अशा महापुरूषांचे जीवनविषयक विचार समाजाला प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे असतात म्हणून त्यांचे स्मरण करणे आवश्यक असते.

प्रबोधिनीच्या या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित, आयक्यूएसी समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे, माजी प्राचार्य व्ही. जी. आपटे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविक प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. एन. के. रासकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ए. एन. शिंदे यांनी केले. प्रा. स्वरूप अहिवळे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!