दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा मार्फत जिल्हास्तरीय खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन याप्रसंगी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कालिदास गुजर, राजगुरू कोथळे, दिलीप चिंचकर खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात तसेच जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनामार्फत अधिकची सुविधा देण्यात भर आहे. जिल्हास्तरीय खेलो इंडिया मैदानी प्रशिक्षणामध्ये सहभागी खेळाडूंचा खर्च शासन करणार आहे. खेळाडूंनी जिद्दी व चिकाटीने आपला खेळ करुन राज्यासह देशाचा नावलौकिक वाढवावा, असे सांगून प्रशिक्षणामध्ये सहभागी खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.
केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत खेलो इंडिया योजनेतून देशातील विविध जिल्ह्यांमध्ये 1 हजार खेलो इंडिया कोचिंग सेंटर पुढील चार वर्षामध्ये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यामध्ये मैदानी खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, क्रीडा साहित्य, तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता शासनाकडून रुपये ५ लाख पर्यंतचे अनुदान सातारा जिल्ह्यास प्राप्त झालेले आहे.
जिल्हास्तर खेलो इंडिया मैदानी क्रीडा प्रशिक्षण केंद्राकरिता १४ व १६ वर्षे वयोगटातील १५ मुले व १५ मुलीं अशा एकूण ३० खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून, प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सकाळ व सायंकाळ सत्रात सुरु राहणार आहे. जिल्हास्तर खेलो इंडिया मैदानी क्रीडा प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडूंची निवड चाचणी दिनांक २९ ते ३० नोव्हेंबर , २०२१ या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल , सातारा येथे आयोजित करण्यात आलेली होती.