दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त फलटणमध्ये दि. १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव तसेच गटविकास अधिकारी व इतर विभागांचे अधिकारी तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
फलटण उपविभागाच्या सर्व आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी, फलटण पत्रकार संघ, फलटणमधील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण यांच्या प्रांगणात हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
त्याचबरोबर उद्या, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी सचिन ढोले यांनी फलटणच्या सर्व नागरिकांना आवाहन केले की, या महारक्तदान शिबिरास सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, त्याचप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन संयोजकांचा आनंद द्विगुणित करावा.
याप्रसंगी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचा व रक्तदात्यांचा सचिन ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.