दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी साधना अकॅडमीजच्या माध्यमातून IIT-JEE/NEET/MH-CET फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता बारावीनंतर विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्या विविध स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी या फाउंडेशन कोर्समधून होईल व विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जातील, असा विश्वास यावेळी आरटीओ इन्स्पेक्टर संभाजीराव गावडे यांनी व्यक्त केला.
शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. गुणवरे पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आव्हानात्मक परीक्षेस सहजरित्या तोंड देता यावे, मेडिकल, इंजीनियरिंग, आयटी, MPSC, UPSC या क्षेत्रात ग्रामीण भागातीलही विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी शाळेने उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. शाळेच्या वेळेव्यतिरीक्त या अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्यात येईल, असे यावेळी गावडे यांनी नमूद केले.
शाळेने राबवलेल्या या उपक्रमाची परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पालक यांनी स्तुती केली व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सस्ते यांनी केले तर आभार प्राचार्य गिरीधर गावडे यांनी मानले.