जनसेवा कॅन्सरग्रस्तांसाठी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२३ | फलटण |
मॅग आणि माऊली फाउंडेशनतर्फे जनसेवा कॅन्सरग्रस्तांसाठी मार्गदर्शन केंद्राचे आज टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईचे कॉन्सिलर श्री. चंद्रगुप्त पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पावसकर यांनी कॅन्सर रोगाच्या बाबतीत माहिती देऊन विविध मुद्द्यांवर माऊली फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे, कॅन्सरचे विविध प्रकार, कॅन्सरवरचे उपचार, नियंत्रण व उपशमन याबद्दल सखोल माहिती दिली. उपलब्ध माहितीनुसार, २०२१ साली अकरा लाख नवीन कॅन्सर रुग्ण सापडले आणि २०११ ते २०२२ या दशकात स्त्रियांच्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. महिलांच्या नियमित तपासणीसाठी मॅमोग्राफी सेंटरची आवश्यकता असल्याचे सांगितले. कॅन्सर रुग्णाबरोबरच सर्व कुटुंबीयांची मानसिक अवस्था या काळात ढासळलेली असते, त्यासाठी रुग्णांचे व कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करून त्यांचे मानसिक संतुलन करणे आवश्यक असते. समुपदेशन कसे असावे याबाबती अनेक रुग्णांचे दाखले देऊन मार्गदर्शन केले.

जनसेवा कॅन्सरग्रस्त मार्गदर्शन केंद्रात पुणे, मुंबई, सातारा येथील डॉक्टरांकडून प्रत्यक्ष आणि ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. कॅन्सर उपचारासाठी असलेल्या शासकीय योजनांची व सवलतीत उपचार करणार्‍या संस्थांची माहिती रुग्णांना पुरवली जाणार आहे. गरजूंनी या मोफत मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!