दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने ध्वजदिन-2021 निधी संकलनाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर (निवृत्त) वि.बा.पाटील हे उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर निधी संकलीत केला जातो. आपल्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा शहीदांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडीचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे याकरिता या निधीचा वापर केला जातो.