फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्यावतीने भिवडी-त्रिपुटी येथे नूतन स्मशानभूमीचे लोकार्पण


भिवडी-त्रिपुटी – येथील नूतन स्मशानभूमीचे लोकार्पण करताना सरपंच सौ. अर्चना शेलार, सरपंच सौ. रूपाली काटकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ. (छाया : अतुल देशपांडे)

स्थैर्य, 12 मार्च, सातारा : मौजे भिवडी-त्रिपुटी, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील स्मशानभूमी नूतनीकरण, दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा स्व. प्रल्हाद छाब्रिया यांच्या जयंतीचे औचित्य साधून भावनिक वातावरणात संपन्न झाला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

स्मशानभूमी ही माणसाच्या शेवटच्या प्रवासाची साक्ष देणारी जागा असते. या ठिकाणी येताना प्रत्येकाच्या मनात दु:ख, आठवणी आणि भावना दाटून आलेल्या असतात. पण भिवडी आणि या दोन गावांसाठी ही स्मशानभूमी केवळ अंत्यविधीची जागा न राहता दोन गावांच्या मनांना जोडणारा एक भावनिक सेतू ठरली आहे.

या स्मशानभूमीची अवस्था यापूर्वी अत्यंत खराब होती. जुने शेड झालेले, फरशी तुटलेली, शवदाहिनीची सोय नसलेली, उतारावरून प्रेत आणताना होणारा त्रास, परिसरात कंपाऊंड नसणे अशा अनेक अडचणींमुळे ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांनी स्मशानभूमीचे संपूर्ण नूतनीकरण केले.

या कामामध्ये नवीन शेड उभारणे, जुने शेड दुरुस्त रंगकाम करणे, नव्या पायर्‍या बांधणे, सावडणे व दहाव्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र शेड उभारणे, संपूर्ण परिसरात पेवर ब्लॉक बसविणे, चारी बाजूंनी करणे, वृक्षारोपण करणे तसेच सौरऊर्जेचा खांब बसविणे अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे आज स्मशानभूमीचे संपूर्ण रूप पालटले असून अंत्यविधीसाठी येणार्‍या लोकांना स्वच्छ, शांत आणि सुसज्ज वातावरण मिळत आहे.
कामाची खरी विशेषता म्हणजे या स्मशानभूमीमुळे भिवडी आणि त्रिपुटी या मुळे दोन गावातील लोकांची मने एकत्र आली. कामाच्या दोन्ही गावांतील ग्रामस्थ, युवक मंडळी आणि स्थानिक प्रतिनिधी एकत्र आले. दु:खाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याची भावना अधिक दृढ झाली. माणसाचा शेवटचा प्रवास सन्मानाने व्हावा, या भावनेतून दोन्ही गावांनी एकत्र येत या साथ दिली.

गावकर्‍यांनी व्यक्त केले की, माणसाचे आयुष्य कसेही असले तरी त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने आणि शांत व्हायला हवा. या कामामुळे मृत्यूनंतरच्या अनेक अडचणी संपल्या असून आता आपल्या माणसांना सन्मानाने निरोप देता येणार आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी केवळ एक बांधकाम न राहता दोन गावांच्या भावनांना जोडणारी एक जिव्हाळ्याची जागा आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, पर्यावरण व या क्षेत्रांमध्ये सातारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यात सहा ठिकाणी सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी सी.पी. सेंटर चालविले जात असून अनेक मुलांना त्याचा आधार मिळत आहे. तसेच पुणे येथील ससून व के.ई.एम. रुग्णालयात नवजात बालकांसाठी एनआयसीयू उभारण्यातही फाउंडेशनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माणसाच्या जन्मापासून ते ते जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजासाठी सेवा देण्याचा फिनोलेक्स च्या कार्यकारी विश्वस्त सौ. रितू छाब्रिया यांनी घेतला असून त्या दृष्टीने मुकुल माधव फाउंडेशन भविष्यात देखील या पद्धतीनेच कार्य करत राहणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे श्री. जगताप व श्री. राठी, मुकुल फाउंडेशनचे पार्थ कलाल व संतोष शेलार, डीलर मनीष शेठ, बंशी शेठ, श्री. जयंती शेठ, गावच्या सरपंच सौ. अर्चना शेलार, त्रिपुटी गावच्या सरपंच सौ. रूपाली काटकर, कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. जगदाळे तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!