
स्थैर्य, पुणे, दि.१९: विविध प्रकारच्या विषाणू संक्रमणाच्या काळात विषमुक्त शेतमालाची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा मात्र होत नाही. विषमुक्त शेतमालाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने अभिनव फार्मर्स क्लब व भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) एकत्र प्रकल्प राबवणार आहेत. सदर प्रकल्पाचे अभिनव फार्मर्स क्लबचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके व भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले. या वेळी शास्त्रज्ञ प्रशांत पाटील व राज्यभरातील २ हजार शेतकरी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
या वेळी बोडके म्हणाले, बीव्हीजी उत्पादनांमुळे शेतमालाचा उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे राज्यातील खेडी समृद्ध होणार आहे. शेतकऱ्यांना श्रीमंत करणे हा बीव्हीजी व अभिनवचा प्रमुख उद्देश आहे.
गायकवाड म्हणाले, बीव्हीजी व अभिनवमुळे शेती क्षेत्रात क्रांती पर्व सुरु झाले आहे. विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवून त्याची थेट विक्री करण्यासाठी प्रकल्पाद्वारे काम करण्यात येणार आहे. प्रकल्पात सहभागी होणारा प्रत्येक शेतकरी लखपती झाला पाहीजे हा आमचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीव्हीजीचे सोशल प्रोजेक्ट हेड रवी घाटे यांनी केले. अभिनवचे भूषण राऊत यांनी आभार व्यक्त केले.