मराठा क्रांती मोर्चाच्या १५ गाव शाखांचे १९ फेब्रुवारीला उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
‘मराठा क्रांती मोर्चा गाव तिथे शाखा व राजकारणविरहित एकजूट’ या संकल्पनेतून मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा रविवार, दि.१९ फेब्रुवारीला सुरू होत असून तब्बल पंधरा गावात या शाखेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सर्व समन्वयक व मार्गदर्शक व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात निघत असताना तालुका पातळीवर सर्वात मोठा मोर्चा फलटण तालुक्यात निघाला. त्यामध्ये फलटणमध्ये लाखोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहून एकजूट दाखविली होती. त्याची दखल घेत ‘मराठा खडा तो सबसे बडा’ हे दाखविले.

दरम्यान, त्यानंतर कोरोनामुळे काहीशी मरगळ समाजामध्ये आली होती. ती मरगळ झटकुन पुन्हा एकदा हाक देत “एक मराठा लाख मराठा” देऊन सर्वांनी एकत्र येऊया, अशी हाक व साथ दिली. त्याअनुषंगाने ‘गाव तिथे राजकारण विरहित “मराठा क्रांती मोर्चा”शाखा स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासू व आपल्या मराठा बांधवाला साथ देऊ असे ठरले. त्यासाठी मुख्य समन्वयकांनी गावागावात जाऊन राजकारणविरहित मराठा म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले व सर्वांनी त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, आता पहिल्या पंधरा शाखांचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी रविवार, दि.१९ फेब्रुवारीला होत असून त्याचे उद्घाटन त्या त्या गावातील युवती व महिलांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यासाठी मुख्य समन्वयक सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना फलटण येथे अभिवादन करतील व त्यानंतर झडकबाईचीवाडी, ताथवडा, पिराचीवाडी, मिरेवाडी, वाघोशी, वडगावं,कोर्‍हाळे, वडजल, काशिदवाडी, ढवळेवाडी, निंभोरे, संगमनगर(नांदल), मुळीकवाडी, बिबी, घाडगेवाडी या पंधरा गावात शाखा होणार असून सर्व समन्वयक, मार्गदर्शक व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटणने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!