नामदेव समाजोन्नती परिषदेच्या फलटण कार्यकारिणीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
समस्त शिंपी समाजाची अग्रणी असलेली ११६ वर्षांची राज्यस्तरीय संघटना नामदेव समाजोन्नती परिषदेच्या फलटण शहराध्यक्षपदी करण भांबुरे तर फलटण ग्रामीणच्या अध्यक्षपदी समाधान कळसकर यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते कार्यकारिणीस नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

फलटण येथील विठ्ठल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय उंडाळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्मा टाळकुटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे होते.

यावेळी सुनील पोरे म्हणाले, समाज हितासाठी प्रत्येक घरातून सहकार्य होण्याची आवश्यकता असून सर्व समाजबांधवांनी खांद्याला खंदा लावून काम करून समाजहित जोपासले पाहिजे. लवकरच राज्यस्तरीय मेळावा सातारला घेण्यात येणार आहे. समाजातील युवकांना एकतेच्या बळाविषयी महती पटल्याचे चित्र सध्या सातारा जिल्ह्यात दिसत असल्याचे सांगितले.

पोरे पुढे म्हणाले, नामदेव समाजोन्नती परिषदेच्या झेंड्याखाली संघटित राहून आपला विकास साधावा. बांधवांशी संवाद साधताना धाग्याने कापड जोडण्याची खासियत असणार्‍या समाजबांधवांनी सध्याच्या गतिमान युगातही एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी सर्वतोपरी मदत करावी व माणूस माणूस जोडावा. मतभेद विसरून ‘शिंपी सारा एक’ हा मंत्र जपायला हवा. सर्वांना सोबत घेतले तर प्रगती अजिबात दूर नाही. फक्त मरणदारी आणि तोरणदारी एकत्र न येता सामाजिक बांधिलकी मानून समाजात सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील पोरे यांनी केले.

यावेळी फलटण शहराध्यक्ष करण भांबुरे व फलटण ग्रामीण अध्यक्ष समाधान कळसकर यांनीही फलटण तालुक्यातील शिंपी समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित आणून सामाजिक कार्य मोठ्या हिरहिरीने आम्ही पदाधिकारी करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी सुभाष भांबुरे यांचेही समयोचित भाषण झाले.

याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना अध्यक्ष सुनील पोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये फलटण शहर ना. स. प. कार्यकारिणी अध्यक्ष करण भांबुरे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, सचिव मनीष जामदार, खजिनदार ज्ञानराज पोरे, सदस्य शेखर हेंद्रे, महेश हेंद्रे, राजेश हेंद्रे, सुनील पोरे, राहुल जामदार, अ‍ॅड. राहुल टाळकुटे, मृणाल पोरे, महेश उरणे, मधुकर मुळे, श्रीमती सुलभा मोहोटकर, श्रीमती रेखा हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली, तर फलटण ग्रामीण ना. स.प. च्या अध्यक्षपदी समाधान कळसकर-निंबळक, उपाध्यक्षपदी संजयकुमार बाचल-गोखळी, सचिवपदी संजय किकले-तरडगाव, खजिनदारपदी अविनाश कुमठेकर-गोखळी, सदस्यपदी शीतल लंगडे-तिरकवाडी, राजेंद्र मोहोटकर-कांबळेश्वर, सूरज बेंद्रे-गिरवी, रोहित नामदास -कोळकी, पांडुरंग किकले-आदर्की बु. यांना समारंभपूर्वक जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ फेटा देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन श्रीमती रेखा हेंद्रे यांनी केले तर आभार श्रीमती सुलभा मोहोटकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!