उमेद अभियानात महिला बचत गटांना मास्कविक्रीतून मिळाले सव्वासतरा लाख रूपये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नरत – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

स्थैर्य, मुंबई, दि. 18 : कोरोना संकटकाळात मास्कनिर्मितीच्या कामाने जिल्ह्यात महिला बचत गटांना रोजगार पुरवला असून, उमेद अभियानात बचत गटांद्वारे सुमारे १ लाख ४६ हजार ९३० मास्कची विक्री होऊन त्यांना अद्यापपावेतो १७ लाख २५ हजार ५१९ रूपये उत्पन्न मिळाले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

कोरोना विषाणूला प्रतिबंधासाठी कापडी मास्कची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुती कापडाचे मास्क तयार करण्यासाचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या प्रयत्नाने प्रारंभी कारागृहातील बंदीजनांकडून व त्यानंतर कस्तुरबा महिला बचत गट समितीकडून सोलर चरख्याच्या माध्यमातून मास्कनिर्मिती सुरू करण्यात आली. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातही बचत गटांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती सुरु करण्यात आली.

उमेद अभियानात जिल्ह्यात स्वयंसहायता समूहांना मास्क बनविण्याकरिता व विक्रीकरिता जिल्हा व तालुका अभियान कक्ष समूहातील महिलांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यात एकूण १७८ समूह हे मास्क बनविण्याच्या कामामध्ये  गुंतलेले आहेत व समूहातील अंदाजे सुमारे दीड हजार भगिनींकडून उत्तम प्रकारची मास्क निर्मिती होत आहे. आजपर्यंत एक लाख ५१ हजार २५५ मास्कची निर्मिती झाली आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार ९३० मास्कची विक्री होऊन १७ लाख २५ हजार ५१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोना संकटकाळात अहोरात्र राबणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभाग, वनविभाग तसेच विविध शासकीय तसेच निमशासकीय विभागांकडून या स्वयंसहायता समूहांना मास्क बनविण्याकरिता ऑर्डर दिली जात आहे. त्यामधून या महिलांना रोजगार मिळत आहे.  ग्रामस्तरावर या महिला कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करत आहेत. गावातील गरीब वंचित घटकातील कुटुंबांना ग्राम संघाकडून घरपोच किराणा देण्यात येत आहे. या संकट समयी गरिबांच्या जीवनामध्ये आशेची ज्योत या महिला जागवित आहे. अश्या प्रकारे उमेद अभियानाचे ग्राम स्तरावर मोलाचे काम ठरत आहे, अशी माहिती उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्याकडून याकामी वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. उमेद स्वयंसहायता समूह ग्राम संघ यांच्या उत्कृष्ट कार्याची व विविध योजनांची माहिती महिला व समुदाय संसाधन व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी वैदर्भी वार्तापत्रही नियमितपणे प्रसारित होत असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

स्थानिक प्रदेशात पिकणाऱ्या कापसापासून सुती कापड तयार करण्याचे काम केले जाते. त्यांच्याकडून तयार मास्क दुपदरी सुती कापडाचे असून सुरक्षित आहेत. हे मास्क स्वच्छ करुन पुनर्वापर करता येतो. स्वयंस्फूर्तीनेही अनेक गट यात सहभागी झाले असून, रोजगारही उपलब्ध होत आहे. अशा विविध बचत गटांकडून अद्यापपर्यंत अडीच लाखांवर मास्कनिर्मिती झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!