फलटण शहरातील स्वच्छतागृह अभावाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या विरोधात शिवसेनेचे भव्य लघुशंका आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण शहर हे वर्दळीचं ठिकाण असलेलं व ऐतिहासिक वारसा लाभलेलं संस्थानिक व कायम गजबजलेलं असं शहर आहे. ग्रामीण भागातुनही बहुतांश स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर फलटण शहरात येत असतात. परंतु या सर्व फलटणकरांसाठी स्वच्छता गृहांचा अभाव ही समस्या मोठ्या प्रमाणावर फलटणकरांना भेडसावत आहे. विशेषतः महिलांसाठी तर आरोग्याच्या दृष्टीने खुपच चिंताजनक बाब असुन महिलांची कुचंबणा करणारं शहर अशी फलटणची ओळख व्हायला लागली आहे. कारण महिलांसाठी शहरात एकही स्वच्छतागृह नाही.

शंकर मार्केट येथील मुतारी फलटण नगरपरिषदेकडुन काही दिवसांपूर्वी पाडण्यात आली. पण मुतारी पाडण्याअगोदर तेथील नागरिकांसाठी काही पर्यायी व्यवस्था फलटण नगरपरिषदेने का तयार केली नाही. असा प्रश्न नागरिकांमधुन विचारला जात आहे. तसं पाहिलं तर शंकर मार्केट येथील पाडलेली मुतारी ही पहिली नाही. या अगोदरही फलटण नगरपरिषदेने ब-याच ठिकाणच्या मुता-या पर्यायी व्यवस्था न करता पाडल्या आहेत. यासंबंधी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना नगरपरिषदेच्या कार्यालयात समक्ष भेटून फलटणकरांची व फलटण शहराची होत असलेली कुचंबणा, मानहाणी यामुळे फलटण तालुक्याची अब्रु चव्हाट्यावर येत असल्याचे फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकारी यांना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

शंकर मार्केट असो वा शहरातील इतर पाडण्यात आलेल्या मुता-या कोणाच्या सांगण्यावरून पाडण्यात आल्या, का पाडण्यात आल्या, त्याची काय कारणे होती, पर्यायी व्यवस्था तात्काळ का उभारली गेली नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी देऊन फलटणकरांचा संभ्रम दुर करणे आवश्यक आहे अशी स्पष्ट भुमिका फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने घेण्यात आली आहे. मुता-या योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीने बांधणे आवश्यक आहे. त्यांची रोजची रोज स्वच्छता ठेवणे नगरपरिषदेचे काम आहे. स्वच्छतेकडे नगरपरिषदेचा पुर्णपणे कानाडोळा असल्याचे फलटण शहरात सातत्याने पहावयास मिळते. मुळात मुता-या बांधल्या त्या नागरिकांच्या मागणीनुसारच बांधल्याना मग कोणाच्या सांगण्यावरून काढल्या आणि का काढल्या याची माहिती समोर येणे अपेक्षित आहे अशी मागणी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व शिवसैनिकांनी केली.

मुता-यांचा अभाव असल्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे उघड्यावर फलटण नागरिकांकडुन मुतारी केली जात आहे ही वस्तुस्थिती आहे, हा प्रकार रोज चालू आहे आणि बहुतांश मुता-या पाडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा प्रकार वाढलेला असुन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुपच चिंताजनक बाब आहे. तसेच फलटण नगरपरिषदचे “स्वच्छ फलटण सुंदर फलटण” हे अभियान फक्त कागदावरच राहीले असुन प्रत्यक्षात मात्र एकप्रकारे फलटणची थट्टा होत असल्याचे दिसून येत आहे हे कदापि सहन केले जाणार नाही असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

येत्या दहा दिवसांमध्ये स्वच्छतागृहांचा विषय निकाली काढण्यात यावा, अन्यथा फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने व फलटण शहरातील तमाम नागरिकांच्यावतीने फलटण नगरपरिषद कार्यालय ते तहसिल कार्यालयापर्यंत रस्त्यावर आडोशाच्या सहाय्याने लघुशंका आंदोलन करण्यात येईल व आंदोलना दरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा ईशारा फलटण तालुक्यातील व शहरातील जनतेच्यावतीने, तसेच फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिला आहे. फलटणचे मुख्याधिकारी यांना निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, आशिष कापसे, अमोल सस्ते आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!