वाहनांची तोडफोड ; एकावर हल्ल्याचा प्रयत्न
स्थैर्य, सातारा, दि. 12 : खेड चौक, विसावा नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळी अज्ञात 5 ते 6 दुचाकी चालकांनी चारचाकी, दुचाकी वाहनांची कोयता, तलवारीच्या सह्याने तोडफोड करत एकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालक पुरते गांगरून गेले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी अज्ञात 5 ते 6 युवक दुचाकीवरून खेड चौक येथे दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी कोयते व तलवारीचा धाक दाखवत दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दुकान चालक गांगरून गेले. त्यापैकी एका युवकाने त्या ठिकाणी असणार्या गाढवावर तलवार हल्ला केला. तेथून ते युवक खेड चौकात असणार्या टेक्स्टाईलच्या पाठीमागे असणार्या चौकामध्ये गेले. तेथेही त्यांनी धुडगूस घातला. तेथून ते सर्व जण दुचाकीवरून विसावा नाका परिसरात दाखल झाले. त्या ठिकाणी मारुती ओमनीच्या काचेवर तलवार मारून काच फोडण्यात आली. मारुती ओमनीच्या चालकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मारुती ओमनी नजीकच असणार्या एका दुचाकीचा आरसाही फोडण्यात आल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अज्ञात युवकांनी वाहनांच्या काचा का फोडल्या. हल्ल्याचा प्रयत्न का केला याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.