दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रम उपसमितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रम उपसमितीमध्ये शिवाजी विद्यापीठासह मुंबई, पुणे, गोवा, सोलापूर या अन्य विद्यापीठातील अनुभवी व तज्ज्ञ सदस्यांचा सहभाग आहे. पदव्यूत्तर विभागाचा अभ्यासक्रम तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम या उपसमिती मार्फत केले जाणार आहे.
सदरील उपसमितीचे अध्यक्ष हे डॉ. दत्ता पाटील हे असून डॉ. रणजित शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अरूण शिंदे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. महेंद्र कदम, डॉ. वासुदेव सावंत, डॉ. प्रवीण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. दत्ता घोलप, डॉ. रमेश साळुंखे, डॉ. एकनाथ पाटील व डॉ. अशोक शिंदे यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे.
सदरील उपसमितीच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सातारा जिल्हा व फलटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.