राज्यस्तरीय ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेत सातारचे धन्यकुमार तारळकर यांचे यश


स्थैर्य, फलटण : जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद व जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षक बंधू-भगिनी साठी राज्यस्तरीय ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्राथमिक विभागातून आठ तर माध्यमिक विभागातून आठ असे पुरस्कार जाहीर केले होते. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरातील शिक्षक बंधू-भगिनीना नवोपक्रम स्पर्धेत संधी मिळावी, राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे. यासाठी आयोजक जीवन गौरव मासिकाचे मुख्य संपादक रामदास वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील १२०० शिक्षकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या विषयावर पाठविले होते. या नवोपक्रम स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डाँ.सतीश मस्के धुळे, प्रा.डाँ.अशोक डोळस अहमदनगर, मुख्याध्यापक रज्जाक शेख अहमदनगर यांनी निकालाचे काम पाहीले. या ऑनलाइन नवोपक्रम स्पर्धेत अनेक उपक्रम शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी सहभाग घेऊन वेगवेगळे उपक्रम राबविले होते. यातून प्राथमिक विभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या उपक्रमशील शिक्षक सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनेनायकुडेवस्ती येथील धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांचा नवोपक्रम स्पर्धेचा विषय “विद्यार्थ्यांमध्ये जाहीरातीच्या माध्यमातून भाषिक कौशल्यांचा विकास करणे” या उपक्रमाला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण घटक शिकताना फायदा झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यांचा विकास झाला असून, विद्यार्थी स्वतःची जाहिरात सतत तयार करू लागले आहेत. या उपक्रमात सर्व शिक्षकवृंद, केंद्रप्रमुख पारशे यांचे सहकार्य लाभले. राबविलेल्या उपक्रमाबद्दल पालकांनी ही समाधान व कौतुक व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!