
दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । सातारा । प्राथमिकशिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने 581 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 57 शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 16 जणांना यापूर्वीच निलंबनाची नोटीस बजावण्यात आली होती. दुसर्या टप्प्यात 83 शिक्षकांची तपासणी झाली. यामध्ये 13 प्रमाणपत्रात गैरप्रकार आढळून आले, तर 7 शिक्षक तपासणीसाठी गैरहजर होते. अशा 20 शिक्षकांना शुक्रवारी नोटीस बजावून आठ दिवसांत खुलासा देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्येअनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासह अन्य आजारासंदर्भात कागदपत्रे जोडली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार आल्याने प्रशासनाने कागदपत्र पडताळणीसाठी गठित समितीने ही 581 शिक्षकांची कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयास दिली आहेत. यापूर्वी दररोज दहा शिक्षकांची पडताळणी होत होती. मात्र, शिक्षकांची संख्या जास्त असल्याने दररोज 25 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात 57 शिक्षकांची पडताळणी झाली असून, यामध्ये यात 12 शिक्षकांची प्रमाणपत्र अमान्य करण्यात आली आहेत. चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी यापूर्वी 16 शिक्षकांना नोटिसा काढलेल्या आहेत.