दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण येथे उद्या शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक-निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश व जाहीर सभा होणार आहे. हा पक्षप्रवेश उद्या, सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे संपन्न होणार आहे.
फलटणमधील राजे गटाचे आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार असले तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश होणार नसल्याने श्रीमंत रामराजे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहणार असल्याचे निश्चित होत आहे. श्रीमंत रामराजे यांनी आपण मनाने कार्यकर्त्यांसोबतच राहणार असल्याची भूमिका बैठकीत जाहीर केली होती.
आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पदाचा राजीनामा देऊन ‘तुतारी’ हातात घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, श्रीमंत रामराजे यांनी अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, यावेळी त्यांनी भाजपवर तसेच भाजप नेते व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तसेच रणजितसिंह यांनी हिंमत असेल अपक्ष लढवून दाखवावे, असे आव्हानदेखील रामराजे यांनी दिले होते.
लोकसभा निवडणुकीवेळी श्रीमंत रामराजे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजेच संपूर्ण राजे गटाने ‘तुतारी’ला समर्थन दिले होते. आता विधानसभेलाही ते ‘तुतारी’ हातात घेतील, अशी चर्चा फलटणमध्ये सुरू होती. आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत अनिकेतराजे व श्रीमंत विश्वजितराजे यांच्या प्रवेशाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.