स्थैर्य, मेढा, दि. १० : जावली तालुक्याच्या पश्चिम भागात प्रमुख पीक असलेल्या भाताच्या लावणीस वेग आला असून, पावसाच्या हजेरीने भात खाचरात गतीने लावणी सुरू आहे. दरम्यान, युरिया खताच्या गुणवत्तेबद्दल शेतकर्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी कडक उन्हामुळे भात रोपे करपण्याची वेळ आली होती. परंतु चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे लावणी उरकून घेण्याचे शेतकर्यांनी नियोजन केले आहे. लावणीसाठी पुरेसे मजूर उपलब्ध होत नसल्याने हंदा (पैरा) पद्धतीने लावणी केली जात आहे.
ज्यांची सिंचनाची सोय होती, त्यांनी एक जुलैपासून भात लावणीस सुरुवात केली आहे तर बेंदरानंतर पाऊस वाढल्यानंतर काही शेतकर्यांनी नाचणी लावगड करण्यास प्राधान्य दिले आहे. यावर्षी कोरोनामुळे मुंबई व अन्यत्र नोकरी करणारे चाकरमाने घरीच असल्यामुळे लावणी करताना कामगारांचा तुटवडा एवढासा जाणवला नाही. काही ठिकाणी पडून असलेली भातशेती लागवडीसाठी तयार करण्यात आल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता लावणीसाठी बैलांचा वापर कमी होऊ लागला असून, पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने लावणी न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पॉवर टिलरच्या साह्याने लावणी केली जात आहे. भात हे या विभागातील प्रमुख पीक असल्याने शेतकरी वर्ग लावणीत व्यस्त असल्याने बाजारपेठही निर्मनुष्य होत आहे. ज्यांनी रोपांची लवकर वाढ व्हावी म्हणून युरिया या खताचे दोन ते तीन डोस दिले, त्यांची रोपे चार ते पाच दिवस हिरवीगार दिसली. परंतु नंतर पिवळी पडली आहेत. त्यामुळे युरिया या खताच्या गुणवत्तेबद्दल शेतकर्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
युरिया खताच्या दर्जाबाबत शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, यामुळे लावणी रखडून नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.