दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । टिळक भवन दादर मुंबई येथे नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदेशाध्यक्षा विद्या कदम यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. तर प्रसिध्द कवयत्री फरझाना इक्बाल यांनी प्रस्तावना करून आपल्या सांस्कृतिक विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. माजी मंत्री व प्रदेशकार्याध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे यांनी आपल्या अतिथीपर भाषणात आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी कोणती धोरणं अवलंबली पाहिजेत याबाबत मार्गदर्शन करून पक्षाच्या बळकटी साठी तुम्ही मला केव्हाही बोलवा पक्षासाठी मी केव्हाही यायला तयार आहे असे अभिवचन दिले. प्रमुख मार्गदर्शिका प्रशासकीय विभाग प्रमुख मा. प्रज्ञाताई वाघमारे यांनी संघटनात्मक बांधणी संदर्भात 30 सप्टेंबर पर्यंत 30 हजार क्रियाशील कार्यकर्ते तयार करणे असे सुचविले त्याचबरोबर सांस्कृतिक विभागासोबत मा राहुलजी गांधी यांची खास बैठक होणार आहे याबद्दल माहिती दिली. आणि ” गांव तिथ कांग्रेस ” या धोरणांतर्गत कलाकारांची बांधणी कशी करता येईल यावर अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रदेशकार्याध्यक्ष सम्राट साळवी, अमोल थोरात, रमाकांत बोराडे, चंद्रकांत पाटील, प्रशांत नांदगावकर, राकेश चव्हाण, ठाणे अध्यक्ष स्वप्नील कोळी, खालिल सय्यद व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे यांनी ग्रामीण कलावंतांच्या समस्येचे विवेचन करून खडी गंमत, गोंधळ, दंडार, भारुड वासुदेव, ह्या सारख्या कलावंतांची आर्थिक परिस्थिति अत्यंत हलाखिची झालेली आहे आणि गावं पातळीवर सरकारच्या ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत असा खेद व्यक्त केला. रेवनाथ देशमुख यांनी काँग्रेसची विचारधारा हा छोटेखानी कार्यक्रम सादर करून बैठकीला रंगत आणली. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी आपल्या अभिनय शैलीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सभागृहाची वाहवा मिळवली तर ही बैठक यशस्वी करण्यासाठी नागेश निमकर यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे आर्थिक सहकार्य केले.