स्थैर्य, मायणी, दि.८: मायणी जिल्हा परिषद गटामध्ये मंजूर झालेल्या विविध रस्त्यांच्या कामाचा श्रेयवाद रंगल्याने गेले सात-आठ महिने थंडावलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हलग्या कडाडू लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचे श्रेय नेमके कोणाचे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मायणी जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांच्या विकासकामाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत विखळे ते औतडवाडी या रस्त्यासाठी 206.84 लाख व तरसवाडी ते गारुडी रस्त्यासाठी 146.98 लाख रुपये असा सुमारे साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्या कामी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आता लवकरच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ते कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी नुकतीच पत्रकारांना दिली. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आक्षेप घेतला. रस्त्याच्या कामांचे श्रेय आमचेच असल्याचे सांगत श्रेयवादाला तोंड फोडले. त्यातूनच गुदगे व येळगावकर समर्थकांना खुराक मिळाला. एकेक कार्यकर्ता रस्त्याचे श्रेय आमचेच असल्याचे सांगू लागला. त्यामधून सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू झाला.
रस्त्याच्या मागणीची पत्रे, निवेदने ते कामासाठी मंजूर झालेल्या रकमेपर्यंत असे सर्वांगीण पुरावे व्हॉट्सऍपवर व्हायरल करण्यात येऊ लागले. त्यापुढे जाऊन डॉ. येळगावकर यांनी आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका, असा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत कलगीतुरे रंगले. कामाला प्रशासकीय मंजुरी फडणवीस सरकारच्या काळात मिळाली असली, तरी प्रत्यक्ष निधी कोणी उपलब्ध करून दिला. नुसत्या कागदोपत्री मंजुरीला काय अर्थ आहे? सातत्याने पाठपुरावा करून सुरेंद्रदादांनी निधी मिळवला आहे. त्यामध्ये येळगावकरांचा संबंध येतोच कुठे? असा सवाल गुदगे समर्थक करीत आहेत, तर त्या रस्त्याच्या कामाची मागणी आम्ही फडणवीस सरकारमधील ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली होती. जून 2019 मध्येच संबंधित कामास मंजुरीही मिळाली होती. आता केवळ निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे खरे श्रेय आमचेच आहे, असे येळगावकर समर्थक सांगत आहेत. त्यामुळे गेले सात- आठ महिने थंडावलेल्या राजकीय आखाड्यात श्रेय वादाच्या हलग्या कडाडू लागल्या आहेत.
बाजारपेठेतील रस्त्याचे काम पूर्ण करा
श्रेयवादात अडकून न पडता गावातील जनजीवन व दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेतेमंडळींनी मुख्य बाजारपेठेतील रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी ताकद पणाला लावावी, अशी मागणी नागरिक व व्यावसायिक करीत आहेत.