दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२३ । फलटण । इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी केंद्र शासनाला योग्य वाटत असेल तर उत्तर कोरेगाव मधील सोळशी ते तडवळे या ६ गावांमध्ये केंद्राने आणि त्याच क्षमतेचा दुसरा कॉरिडॉर राज्य शासनाने म्हसवड येथे उभारावा त्यातून सातारा जिल्ह्याला दोन इंडस्ट्रियल कॉरिडॉर मिळतील, ते जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे ठरेल अशी मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत आज लक्षवेधीद्वारे शासनाकडे केली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारी संस्था असून उत्तम प्रकारे काम करणाऱ्या या संस्थेमार्फत म्हसवड आणि केंद्र शासनामार्फत कोरेगाव असे २ इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारण्याची मागणी करतानाच त्यासाठी माण, फलटण या दोन्ही मतदार संघातील लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घ्यावी, त्यामध्ये मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल याची ग्वाही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या चर्चेत दिली.
दिल्ली – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रमाणे मुंबई – बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरची नवी योजना केंद्र शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव येथील जागेस सहमती दर्शविल्याचे निदर्शनास आणून देत सोळशी, तडवळे वगैरे ६ गावातील ही जागा मुख्य रस्त्यापासून ६ कि. मी. अंतरावर आणि म्हसवड मुख्य रस्त्यापासून १०० कि. मी. आत असल्याने त्याबाबत विचार होणे साहजिक आहे.
राजकीय विचार किंवा हेवेदावे दूर ठेवून कोरेगाव आणि म्हसवड या दोन्ही कॉरिडॉर साठी सहमती न दर्शविता वाद होत राहिले तर कदाचित हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर सांगली किंवा सोलापूर कडे जाण्याचा धोका लक्षात आणून देत या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून सकारात्मक चर्चेतून योग्य तोडगा काढण्याची मागणी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
सोळशी तडवळे जागेला विरोध असल्याचे सांगितले जात असले तरी आज कोणत्याही ठिकाणी भूसंपादन सहजासहजी होत नाही कोणी ना कोणी विरोध करतात मात्र पाठिंबा देणारेही असतात हे निदर्शनास आणून देत सदर ६ गावातील ग्रामपंचायतींचे पाठिंबा देणारे ठराव आपल्याकडे असल्याचे निदर्शनास आणून देत ते शासनाकडे पाठवीत असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात सांगितले.
आ. महादेव जानकर यांनी या चर्चेत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रस्तावास सहमती दर्शविताना म्हसवड हा कायम दुष्काळी पट्टा असल्याने त्याला प्राधान्य मिळाले तर तेथे विकासा बरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि म्हसवड कॉरिडॉरची आवश्यकता नमूद केली.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रस्तावास सहमती दर्शवीत या भागातील सर्व लोकप्रतिनिधींची विशेष बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोलावून योग्य निर्णय करण्याचे आश्वासन दिले. त्याच वेळी कोरेगाव येथील जागेच्या विरोधाची पत्रे एम आय डी सी कडे दाखल झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय झाल्याचे खरे आहे, तथापि या जागेला विरोध असल्याने अन्य फिजिबिलिटी तपासून त्याबाबत अहवाल केंद्राकडे पाठविला आहे, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.