
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । खटाव । मायणी, ता. खटाव येथील एकाच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची कारवाई होणार होती. यासाठी जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी न्यायालयापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आ. जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांना आज जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आ. जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहाजणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मायणीतील महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरुन दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामध्ये जमिनीची खोटी कागदपत्रे बनवण्यात तलाठ्याचा सुध्दा हात असल्याची तक्रार आहे. या तक्रारीनंतर जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आ. जयकुमार गोरे यांना वडूज न्यायालयात शरण या आणि त्यानंतर जामिनासाठी अर्ज दाखल करा असे निर्देश दिले होते. त्यानंतर काही कालावधीत आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज न्यायालयासमोर हजर राहून नंतर सातारा न्यायालयात मायणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत शुक्रवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे मांडल्यामुळे न्यायालयाने मायणी जमिनी खोटी कागदपत्रे प्रकरणात भाजप आ. जयकुमार गोरे यांना अंतिरम जामीन मंजूर केला आहे.