स्थैर्य, सातारा, दि. 22 : येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून फ्लॅटमधील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोकड असा 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला. ही घटना दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. लॉकडाऊनमध्येच घरफोडी झाल्याने गोडोली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अगंध लक्ष्मण नलावडे (मूळ रा. नलावडेवाडी तारगाव, ता. कोरेगाव) यांचा गोडोली येथील मंगलमूर्ती बिल्डींगमध्ये ए 8 फ्लॅट आहे. दि. 3 एप्रिल 2020 ते दि. 19 मे दरम्यान या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटय़ाने आत प्रवेश केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. याप्रकरणी अगंध नलवडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि मोरे करीत आहेत. दरम्यान, जिह्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच लोक आपल्या घरात थांबून आहेत मात्र लॉकडाऊन काळातच घरफोडी झाल्याने गोडोलीतील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.