दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण-आसू रोडवर अलगुडेवाडी गावच्या हद्दीत सुमारे १२ जणांनी एका कुटुंबास लोखंडी गज व बॅटने मारहाण केल्याची घटना काल दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवळी फिर्यादीच्या आईचा विनयभंगही मारहाण करणार्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची फिर्याद पोलिसांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले मुनीर आमीन सय्यद (वय २८, रा. महतपुरा पेठ, मलठण, ता. फलटण) यांच्या जबाबावरून नोंदविली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी भैय्या बोडरे व इतर सुमारे ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची फलटण शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, काल, दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मुनीर आमीन सय्यद हे त्यांच्या कंपनीच्या बोलेरो गाडी (एमएच१२एलडी८०७६) मधून त्यांची बहीण परवीन इक्बाल शेख हिला भेटण्याकरीता सोनगाव (ता. बारामती) येथे फिर्यादी हे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असे निघाले असताना त्यांची गाडी फलटण ते आसू रोडने अलगुडेवाडी गावच्या हद्दीत अभिराम लॉन्सजवळ आली असता त्यांच्या गाडीसमोर चार मोटारसायकलींवरून १२ जण जोरात निघाले होते.
त्यावेळी फिर्यादी हे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जात असताना हॉर्न वाजवला म्हणून त्यांनी फिर्यादी यांना मोठ्याने शिवीगाळ केली. त्याचवेळी पुढे चाललेल्या दोन गाड्या आडव्या आल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांची गाडी थांबवली व ते गाडीतून खाली उतरेपर्यंत त्यातील दोघाजणांनी माझ्या वडीलांजवळ येऊन त्यांना मारहाण करण्यात सुरूवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी खाली उतरून ‘काय झाले’, असे विचारले असता भैय्या बोडरे व आणखी इतर ११ जणांनी फिर्यादी मुनीर आमीन सय्यद व त्यांच्या वडिलांना लोखंडी गज व बॅटने जबर मारहाण केली.
यावेळी फिर्यादी यांची आई भांडणे सोडविण्यास आली असता आरोपींनी त्यांची साडी ओढून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्यांना व फिर्यादीची पत्नी तसबीन यांना मारहाण करू लागले. यावेळी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सव्वातोळ्याचे दागिने गहाळ झाले आहेत व यावेळी तसबीन यांना दोघाजणांनी चापट्या मारल्या आहेत. तसेच यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ, दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या मारहाण प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी भैय्या बोडरे व इतर ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.