दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण शहराचे उपनगर समजले जाणार्या कोळकी गावची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये आजी-माजी पदाधिकार्यांमध्ये चांगलीच जुंपली असून अगदी विषय हमरी-तुमरीपर्यंत गेला असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच विद्यमान महिला सदस्यांमध्ये सुद्धा हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमावरून मोठा वादंग झाला असल्याची चर्चासुद्धा कोळकीमध्ये जोरात सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळकी ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजित आहे. यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमावरून चांगलीच खडाजंगी झाली असल्याचे उपस्थितांनी पाहिले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून ‘कोळकी’ गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. कोळकीसाठी श्रीमंत संजीवराजे यांचे नेहमीच झुकते माप राहिलेले आहे. जिल्हा व राज्य पातळीवरून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नेहमीच भरघोस असा निधी कोळकीसाठी मंजूर करून आणला जातो; परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोळकीमध्ये सुरू असलेले राजकारण पाहून ग्रामस्थ चिंतेच्या वातावरणामध्ये आहेत.