पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हजार सदस्य करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । अखिल भारत हिंदुमहासभा महाराष्ट्रात वाढविण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान एक हजार सदस्यांची नोंदणी करण्याचा आणि पदाधिकारी नियुक्त करुन सर्वच जिल्ह्यात हिंदुमहासभा वाढविण्याचा निर्णय अखिल भारत हिंदुमहासभेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सातारा येथे घेण्यत आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अँड. गोविंद तिवारी (जळगाव) होते. हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

अखिल भारत हिंदुमहासभेच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सातारा येथील गुजराती महाजन वाडा सभागृहात झाली. या बैठकीला उपाध्यक्ष अनुप केणी(मुबई), विलासराव खानविलकर (रत्नागिरी), रमेश सुशीर (जळगाव), प्रमुख कार्यवाह दत्तात्रय सणस (सातारा), कोषाध्यक्ष महेश सावंत (ठाणे), कार्यालयीन कार्यवाह हरिश्चंद्र शेलार (मुंबई), सहकार्यवाह उमेश गांधी (सातारा),  देवीदास भडंगर (जळगाव), सहसंघटक गोविंद पवार (ठाणे), प्रदेश प्रवक्ता आनंद कुलकर्णी (जयसिंगपूर),  कार्यकारिणी सदस्य अलका साटेलकर (मुंबई), मनोहर सोरप, राजेंद्र शिंदे, रेखा दुधाणे, (सर्व कोल्हापूर), धनराज जगताप, सत्वशीला सणस, प्रवीण बाबर, ललित ओसवाल ( सर्व सातारा) आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदुत्वाची विचारधारा असलेला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वात घडलेला हिंदुमहासभा हा पक्ष राज्यात सर्वत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्त करणे आणि पहिल्या टप्प्यात किमान एक हजार सदस्य संख्या नोंदविण्याची मोहीम हाती घेणे अशी दोन कार्ये तात्काळ सुरु करण्यात यावीत, जनतेचे प्रश्न घेऊन शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांचे दरवाजे ठोठावण्याचे काम ज्यात्या जिल्ह्यातील पदाधिका-यांनी हाती घ्यावे, हिंदु धर्मात जातीपाती आणि भाषेवरुन फूट पाडण्याचा प्रयत्न करणा-या शक्ती विरोधात भूमिका घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजावेत असे निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे श्री कुलकर्णी यांनी सांगितले.

चांगली नोकरी सोडून गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ हिंदुमहासभेच्या माध्यमातून हिंदुत्वाचे काम करणारे मुंबई येथील ज्येष्ठ नेते दिनेश भोगले यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्याची माहिती देणारा गौरव अंक प्रकाशित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या गौरव अंकाच्या माध्यमातून आणि लोकवर्णणीतून किमान एक लाख रुपयांची थैलीही श्री भोगले यांना देण्याचेही यावेळी ठरविण्यात आल्याचे श्री कुलकर्णी यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!